spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’च्या इंग्रजी शिक्षण मॉडेलची ‘केंब्रिज’कडून दखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

इंग्रजी भाषेतील प्रावीण्य वाढविण्यासाठी गेल्या चार वर्षांत १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन केंब्रिज लिंग्वास्किल प्रमाणपत्र मिळवून देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या कार्याचा चार वर्षांचा प्रभाव-अभ्यास (Impact Study) केंब्रिज विद्यापीठ, यूकेने प्रकाशित केला आहे. या अभ्यासाचे प्रकाशन तसेच लिंग्वास्किल प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवारी विद्यापीठाच्या प्रयाग सभागृहात पार पडला.

केंब्रिज विद्यापीठाचे उत्पादन व्यवस्थापक इयान कॉवली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोव्होस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, केंब्रिज विद्यापीठाच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता मेहता, केंब्रिज परीक्षा केंद्राचे व्यवस्थापक डॉ. अतुल पाटील, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या अधिकृत केंब्रिज केंद्राच्या माध्यमातून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण आणि मूल्यांकन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार, ‘केंब्रिज इंग्लिश मूल्यमापनाद्वारे रोजगारक्षम संवादकौशल्यांची बळकटी’ या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्याचा आणि रोजगारक्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यापीठाने राबविलेल्या इंग्रजी भाषा उपक्रमाचा अभ्यास व मूल्यांकन केंब्रिजतर्फे करण्यात आले.

एमआयटी एडीटी केंब्रिज केंद्राद्वारे मागील चार शैक्षणिक वर्षांत १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेच्या प्रावीण्याचे प्रशिक्षण घेत प्रमाणपत्र मिळविले आहे. मागील शैक्षणिक वर्षात लिंग्वास्किल परीक्षेला बसलेल्या ३,४६१ विद्यार्थ्यांपैकी ३७८ विद्यार्थ्यांनी सी१ आणि सी२ ही उच्च प्रावीण्याची पातळी प्राप्त केली आहे. या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादकौशल्याचे मानदंड गाठल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये जागतिक रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचेही केंब्रिजच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) मधील कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या उद्दिष्टांशी या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे.

‘इंग्रजी भाषेशी मैत्री करा’ : कॉवली
इंग्रजी किंवा अन्य तद्सम कोणत्याही भाषेला केवळ नोकरी मिळविण्याचे साधन अथवा कौशल्य समजू नका. भाषेशी मैत्री करा. मग ती कोणतीही भाषा असो, ती तुम्हाला प्रावीण्य मिळवून देईल. इंग्रजी भाषेशी मैत्री केल्यामुळेच मी जगभर फिरू शकतो. त्यामुळे, केंब्रिज आणि एमआयटी एडीटी विद्यापीठ यांच्यातील ऋणानुबंधातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादकौशल्य विकसित करून आपल्या स्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन केंब्रिज विद्यापीठाचे व्यवस्थापक इयान कॉवली यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!