शबनम न्यूज | प्रतिनिधी
पोलिसांचे वाहन थांबवित असताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर भरधाव थार गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरातील वडगाव घेनंद (ता. खेड) येथे घडली. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी MH-08-BG-6984 क्रमांकाची थार गाडी चालवत होता.
२१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने मोशी-चाकण तसेच चाकण चौक-शिक्रापूर मार्गावर वाहन निष्काळजीपणे चालवून काही वाहनांना धडक दिल्याचा आरोप आहे. या घटनेत अविनाश गोविंद मोरे (वय २०, रा. मेदनकरवाडी) यांच्या तोंडाला किरकोळ दुखापत झाली.
यानंतर पोलिस कर्मचारी आरोपीची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना वडगाव घेनंद येथे आरोपीने पोलिसांच्या अंगावर थार घालण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस कर्मचारी बाजूला झाल्यानंतर आरोपीने पुन्हा सरकारी वाहनाला धडक दिली. त्यानंतर गाडी वळवून पुन्हा पोलिसांच्या दिशेने भरधाव वाहन नेल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादीच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून सरकारी वाहनाचेही नुकसान झाले.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), २८१, १२५, ३२४(३), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीच्या भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ संदर्भाचाही नोंदवहीत उल्लेख आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




Total Users : 224868