शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यसमरातील सर्वांत प्रेरक, स्फूर्तीदायक आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले पर्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्यकर्तृत्व आणि आझाद हिंद फौजेच्या निर्मितीतून त्यांनी छेडलेले स्वातंत्र्ययुद्ध…नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या वाद्यवृंदाची विस्मृतीत गेलेली गीते ‘जयहिंद’ या कार्यक्रमांतून सादर झाली आणि त्या चैतन्यमय गीतांच्या सादरीकरणातून नेताजींचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, त्यांचे लोकोत्तर कार्य, स्वातंत्र्याची तळमळ, त्यासाठी केलेला अपूर्व त्याग आणि याच गुणांचे पाथेय आपल्या सैनिकांना देण्याचे त्यांचे सामर्थ्य…यांचा प्रत्यय प्रेक्षकांना मिळाला.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत सोमवारी रात्री बालगंधर्व रंगमंदिरात ‘जयहिंद’चे प्रेरणादायी सादरीकरण झाले. नेताजींच्या आझाद हिंद सेनेचा वाद्यवृंद, त्यासाठी लिहिली गेलेली स्फूर्तीगीते (मार्चिंग साॅग्ज) यांचा शोध घेऊन त्या गीतांचे संकलन, साजेशी संहिता, निवेदन आणि समन्वयन प्रदीप निफाडकर यांनी केले होते. निर्मिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची होती. व्यवस्थापन सौ. अनिता निफाडकर यांचे होते. संगीतासह गायन सहभाग शंतनु पानसे, केतन गोडबोले, डाॅ. अनघा जोशी यांचा होता. संगीत संयोजन केदार परांजपे यांचे होते. केदार तळणीकर (तबला), संदीप बंकापुरे (ऱ्हिदम) यांनी साथ केली. निर्माते आणि पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण,कार्यवाह प्रसाद मिरासदार, जलतजन्य डॉ मंगेश कश्यप, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, आळेगावचे माजी सरपंच विजय कुऱ्हाडे, ह भ प नीलिमाताई पाटोळे आदी उपस्थित होते
विश्वस्त मोहन टिल्लू बालगंधर्व कार्यक्रम समन्वयक श्रीकांत कांबळे यावेळी उपस्थित होते.
निफाडकर यांनी संकलित केलेल्या ४० गीतांपैकी १४ गीतांचे सादरीकरण जयहिंद या कार्यक्रमात झाले. जनगणमन या राष्ट्रगीताचा हिंदी अनुवाद आवर्जून सादर करत कार्यक्रमाची सुरवात झाली. पाठोपाठ ‘गयी रात आया प्रभात हम निद्रा से जागे..’हे गीत प्रभावशाली ठरले. ‘नवयुग आया, जीवन लाया…’असा आशावाद त्यात व्यक्त झाला होता. ‘चल चल रे नौजवान’, ‘कौमी तिरंगे झंडे उँचे रहो जहाॅ मे’, ‘शीश झुकाकर भारतमाता तुझको करू प्रणाम’, ‘हम भारत की बेटी है,’ हम हिंदी सिपाही है, ब्रिटिश को दिखा देंगे, कदम कदम बढाए जा, आझादिये वतन का फरेरा उडाये जा, मिटा देंगे हुकूमत को हम ऐसा कर के छोडेंगे, नेताजी हमारे हसते हसते जीना, वो जानेवाले नेता हमको न भूल जाना, सारे जहाॅ से अच्छा….अशा एकेक गीतांतून व्यक्त झालेला धगधगता संघर्ष, स्वातंत्र्याची आस, पराकोटीचे त्यागपर्व, देशाच्या नागरिकांसाठी मनात असलेली आस्था, मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्राणार्पणाचा संकल्प आणि कृती, देशाने स्वीकारलेल्या तिरंग्याशी असलेली निष्ठा, तू मान है हमारा, तू शान है हमारी ही भावना, युद्धानंतरची रखना है तुझे बुनियाद अमन की या जबाबदारीची जाणीव…अशा अनेक भावनांचे पदर या गीतांमध्ये लपेटलेले होते.
निफाडकर यांच्या निवेदनातून या गीतांमधील आशय तसेच आझाद हिंद सेनेच्या अधिकार्यांविषयीची वेगळी माहितीही रसिकांसमोर आली. दृकश्राव्य सादरीकरणातून निवेदनाला पूरक अशी छायाचित्रे, तपशील, संदर्भ मिळाल्याने नेताजींचे उदात्त व्यक्तिमत्त्व आणि आझाद हिंद सेनेचे अभूतपूर्व कार्य अधोरेखित झाले.




Total Users : 224868