शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे, पुणे फेस्टिव्हल हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नसून, त्यामागे दिवंगत नेते सुरेश कलमाडी यांची दूरदृष्टी असल्याचे प्रत्यक्ष महोत्सवाला भेट दिल्यानंतर जाणवले. पुणे फेस्टिव्हल आगामी काळात अधिक व्यापक आणि शाश्वत स्वरूपात सुरू राहिला पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
गणेश कला-क्रीडा रंगमंदिर येथे निर्माते, लेखक व दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा ७० एमएम’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे दिवंगत संस्थापक सुरेश कलमाडी यांच्या तैलचित्रास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, कॉंग्रेस शहराध्यक्ष (पूर्व विभाग) प्रशांत जगताप, अशोक हांडे , नगरसेवक सुनील शिंदे, बाळासाहेब अमराळे, निरुद्दीन सोमजी, सुनील मलके, सौरभ अमराळे आणि सचिन आडेकर उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘‘माझ्या गावात अनेक वर्षांपासून वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुणे फेस्टिव्हलबाबत वाचत होतो. मात्र, आज प्रत्यक्ष महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्याची व्याप्ती आणि महती समजली. यातून सुरेश कलमाडी यांची दूरदृष्टी प्रत्ययास येते. नियतीने कलमाडी यांना आपल्यातून हिरावून घेतले असले, तरी पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांची ओळख आजही कायम आहे.’’
पुणे फेस्टिव्हल हा सर्वसमावेशक सांस्कृतिक उपक्रम असल्याचे सांगत सपकाळ यांनी सामाजिक सलोख्याचाही मुद्दा मांडला. समाजात जाती-धर्मांमधील भेदभावाची दरी वाढत असताना संस्कृतीच्या नावाखाली एकाच विचाराची व्याख्या पुढे केली जात असल्याचे ते म्हणाले. साने गुरुजींच्या विचारांचा संदर्भ देत, ‘‘स्वतःच्या ताटातील अन्न सर्वांनी वाटून खाणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘यंदा पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून ‘अंधमुक्त पुणे’ हे अभियान हाती घेण्यात आले असून नेत्रदानाबाबत जनजागृती केली जात आहे. यंदा विविध विषयांवरील एकूण ५३ विनामूल्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.’’ पुणे फेस्टिव्हल हा पुणेकरांचा महोत्सव असल्याचे सांगत, पुढील वर्षी कोणता नवीन कार्यक्रम पाहायला आवडेल, याबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, अशोक हांडे दिग्दर्शित ‘मराठी बाणा-७० एमएम’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा, संतपरंपरा, सण-उत्सव आणि लोककलेचे विविध पैलू गीत-नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम रंगला.
‘मराठी बाणा’ने रंगविले मराठी संस्कृतीचे वैभव
गणेश कला-क्रीडा रंगमंदिरात अडीच हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’ने कलाकारांना दाद
मराठी संस्कृती, परंपरा, लोककला आणि संतपरंपरेचे वैभव गीत-नृत्याच्या माध्यमातून उलगडणाऱ्या निर्माते, लेखक व दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा-७० एमएम’ या कार्यक्रमाने पुणेकर रसिकांची मने जिंकली. गणेश कला-क्रीडा रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. अडीच हजार आसने भरल्यानंतरही अनेक रसिकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’च्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण रंगमंदिर दुमदुमून गेले.
‘उठी उठी गोपाळा…’ या भक्तिरसपूर्ण गीताने कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. त्यानंतर ‘कोंबडा अरवला… झुंज मुंज पहाट झाली’ यांसारख्या गीतांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे रंगमंचावर दर्शन घडविले. आदिवासी व ठाकर समाजाच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘आम्ही ठाकर, ठाकर या रानाची पाखरं…’ तसेच ‘माळ्याच्या मंळ्यामध्ये पाटाचे पाणी जाते…’ या गीतांवरील नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
‘एकविरा आई तू डोंगरावरी’ या कोळी गीताने वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण केला. रसिकांनीही या गीताच्या तालावर ठेका धरत शिट्ट्या वाजवून कलाकारांना दाद दिली. मंगळागौरीची पारंपरिक गाणी, संतांच्या शिकवणीचा संदेश देणारे भारूड, गोपाळकाला, गणेशोत्सव तसेच महाराष्ट्रातील विविध सण-उत्सवांवर आधारित गीत-नृत्यांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. तमाशातील ढोलकीच्या तालावर सादर झालेल्या गीतांनी मराठी लोककलेचे वैभवही प्रभावीपणे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले. सचिन मुळे, रुद्रेश कानविंदे, रवी आल्हाट, नागेश मोरवेकर तसेच कस्तुरी वावरे, अस्मिता काळे, नंदा भामरे आणि पूजा वनकर यांनी आपल्या दमदार गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. ध्वनी व्यवस्था दिलीप बोनाटे, तर प्रकाशयोजना सुनील जाधव यांनी सांभाळली.
अशोक हांडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे महत्त्व विशद केले. ‘मराठी मातीचा गुण श्रमाला महत्त्व देणारा आहे. विविध सण, परंपरा आणि लोककलांमधून महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध झाली आहे. अध्यात्म आणि संस्कार यांची सांगड महाराष्ट्रीय संस्कृतीने घातली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेली सांस्कृतिक परंपरा आजही दिमाखात सुरू असल्याचा आनंद असल्याचे हांडे यांनी नमूद केले. पुणे फेस्टिव्हलच्या पहिल्या वर्षी ‘मंगल गाणी’ हा कार्यक्रम सादर केला होता. तो कार्यक्रम पुन्हा पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हलमुळे मराठी कला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉ. सतीश देसाई यांनी पुणे फेस्टिव्हलमधील सांस्कृतिक, नृत्य, कला, क्रीडा, साहित्य आणि कविता अशा विविध कार्यक्रमांना रसिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.




Total Users : 224868