शबनम न्यूज | प्रतिनिधी
उपहास, उपरोध, शाब्दिक कोट्या आणि समाजात हरघडी दिसणारी विसंगती, यावर हलक्याफुलक्या शैलीत गमतीदार टिप्पणी करणाऱ्या कवितांनी रविवारी हिंदी हास्य कवी संमेलन रंगले. कवितांच्या जोडीने हिंदी हास्यकवींनी रंगवून कथन केलेले चुटके, किस्से यांनाही टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद मिळाला.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे हिंदी हास्य कवी संमेलन पार पडले. राजस्थानचे ज्येष्ठ कवी जगदीश सोलंकी, कवी बुद्धीप्रकाश, लखनौचे डाॅ. सर्वेश आस्थाना, हरियाणाचे अरुण जेमिनी, पुण्याचे दिलीप शर्मा आणि प्रतापगढच्या कवयित्री साक्षी तिवारी यांच्या कवितांनी हिंदी हास्य कवितांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. सुरवातीला पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड माजी गृहराज्यममंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते सर्व कवींचा सत्कार करण्यात आला.
गोयल म्हणाले, ‘साहित्यकलेच्या दर्जेदार सादरीकरणाला मनापासून दाद देणारे पुणे हे शहर आहे. हिंदी हास्यक वितांच्या रूपाने उत्तम साहित्यिक मैफल इथे रंगते आहे. सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीत हास्याचे महत्त्व अधिक आहे. रसिकांच्या चेहर्यावर आणि मनातही हास्यरंग फुलविणारे हे सादरीकरण ठरेल. या क्रयाक्रमाचे मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे अध्यक्ष नितीन न्याती, प्राईड ग्रुपचे प्रमुख अरविंद जैन, कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. द्वारका जालान यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.
साक्षी तिवारी यांनी प्रारंभी सरस्वतीस्तवन सादर केले. त्यानंतर कवी बुद्धीप्रकाश यांनी काहीशा उपरोधाने भरलेली कविता सादर केली.
दर्द और कडवे वचन भी जब सहन होने लगे
तब समझ लेना के ‘बुद्धी’ अब तो जीना जान गये, अशा ओळींतून जगण्याविषयीचा उपरोध त्यांनी व्यक्त केला.
साक्षी तिवारी यांनी उपरोधाची ही धार अधिक तीव्र करणारी
अभी मुस्कुराने का मन तो नही है
तुम्हारे लिये मुस्कुराना पडेगा
कोयी आप के नाम से मुझको छेडे
उन्हे क्या बताऊ बता दिजिएगा, अशा साध्या शब्दांतली कविता सादर केली.
मुहब्बत मे ये जो कमी चल रही है, बिना बातही बेरुखी चल रही है
कई दिनसे कोयी खबर भी नही हे. कही ना कही गडबडी चल रही है.. या कवितेतून हलक्याफुलक्या विनोदाची पखरण साक्षी यांनी ऐकवली.
दिलीप शर्मा यांनी ‘लागा चुनरी मे दाग’, या प्रसिद्ध गीताच्या चालीवर ‘लागा खादीपे दाग छुपाऊ कैसे, जाके बापूसे नजरे मिलाऊ कैसे’, असे विडंबनकाव्य सादर करून दाद मिळवली.
सर्वेश आस्थाना यांच्या कवितेतून हास्यरंगाप्रमाणेच देशप्रेमाचा रंगही प्रकट झाला.
क्या बतलाऊ इस धरतीपर कैसा लगता है, इस मिट्टी का जर्रा जर्रा अपना लगता है, या त्यांच्या ओळींनी ठाव घेतला.
अरुण जेमिनी यांच्या हास्यकवितेतून गंभीर आशय व्यक्त झाला होता. कारगिल युद्धात जखमी झालेल्या सैनिकाला भिकारी, कवी, प्राध्यापक, नट, नेता आणि शाळकरी मुलगा यांचे रक्त दिले गेल्यावर, त्या सैनिकाची बोली कशी बदलते, अशी एक गमतीदार फँटसी त्यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली.
जगदीश सोलंकी यांच्या तिरंगा या गाजलेल्या कवितेने या रंगतदार हास्यकवी संमेलनाची सांगता झाली. जीवनात छोट्या कारणांनी निराश झालेल्यांना सैनिकों को देखलो, जवानी लौट आती है…असा संदेश त्यांनी कवितेतून दिला.
या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.




Total Users : 224359