शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून ‘महफिल-ए-शायरी’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध शायर मा. म. भा. चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना म. भा. चव्हाण यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांचे महत्त्व अधोरेखित केले. “हिंदी ये राजभाषा है, राष्ट्रीय एकात्मता की भाषा है. मैं मराठी का शायर हूँ, मैं हिंदी भाषा को प्रणाम करता हूँ,” असे सांगत त्यांनी सर्व भाषा समान आणि आदरणीय असल्याचा संदेश दिला. भाषिक विविधतेसोबतच स्त्री सन्मानाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे शस्त्र हाती घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. कर्मवीरांच्या कार्याचा संदर्भ देत त्यांनी, “गरीब, मजदूर और श्रमिक को अपने सीने से लगाया है… कितना भी हो अंधेरा घना हमारे आसपास, हम तो तूफानों में भी दिया बनकर जलते हैं,” अशा काव्यपंक्तींमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
भाषांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा कोणताही भेद नसून प्रत्येक भाषा ही आपापल्या संस्कृतीची आणि भावविश्वाची वाहक आहे, असा सर्वसमावेशक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा. स्वाती चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिताली वाघमारे यांनी केले, तर आभार प्रा. गौरी माळी यांनी मानले. कार्यक्रमात तब्बल २६ विद्यार्थ्यांनी आपापल्या शायरीचे सादरीकरण केले. विद्यार्थिनी श्रेया कांबळे हिनेही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सुमारे ११० विद्यार्थी उपस्थित होते. शायरी, कविता आणि विचारांच्या माध्यमातून हिंदी दिनाला साहित्यिक आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘महफिल-ए-शायरी’ कार्यक्रम संस्मरणीय ठरला.




Total Users : 224373