शबनम न्यूज | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत समाजकल्याण विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज ‘आशीर्वादाचा दिवा’ आणि ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या.
समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आणि विशेष अधिकारी माधुरी वाघमोडे यांनी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थी सांची विलास यादव यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट देऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला. सांची यादव यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे संज्ञानात्मक मेंदूविज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यावेळी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती जाणून घेत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडचणी आणि गरजा जाणून घेत त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली.
पुणे शहरातील अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गटई स्टॉलनाही अधिकाऱ्यांनी भेट दिली. विजय लक्ष्मण वरचाये, गजानन संपत अवचरे आणि कालिदास बाजीराव वाघमारे यांच्या स्टॉलवर ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
‘सेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सेतू अभियान, सेवा माझे योगदान, सेवा ज्योती यात्रा, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, नमो सेवागाथा यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली. यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी, गृहप्रमुख, गृहपाल तसेच कर्मचारी उपस्थित होते.




Total Users : 223470