शबनम न्यूज | प्रतिनिधी
कला, साहित्य, संगीत, संस्कृती आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ संदर्भात आज महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून महोत्सवाची रूपरेषा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांचा सहभाग तसेच पुरस्कार सोहळ्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
शहरातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळावी तसेच कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा गौरव व्हावा, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या त्रिदिवसीय सांस्कृतिक पर्वात विविध कलाविष्कार, नामवंत कलाकारांचे कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम, संगीत, लोककला तसेच विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक अस्मिता, कलावैभव आणि सर्जनशीलता अधोरेखित करणारा हा महोत्सव ठरणार आहे.
शहरातील कलाकार, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि गुणवंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार कलाविष्कारांचा अनुभव घेता यावा, या दृष्टीने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेस आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे आणि नगरसदस्य राहुल कलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची मिळेल” – स्वागताध्यक्ष तथा महापौर रवि लांडगे
“पिंपरी-चिंचवड शहर हे केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे शहर म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वाटचालीतील संस्मरणीय पर्व ठरेल,” असे स्वागताध्यक्ष तथा महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
“स्थानिक प्रतिभेला व्यापक व्यासपीठ देणारा महोत्सव” – मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे
“पिंपरी-चिंचवडमध्ये कला, साहित्य, संगीत, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रात मोठी प्रतिभा आहे. या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता आहे. ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’च्या माध्यमातून स्थानिक कलाकारांसोबत विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव होणार असून शहराच्या सांस्कृतिक चळवळीला अधिक बळ मिळेल,” असे मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
“सर्वांच्या सहभागातून शहराचा सांस्कृतिक उत्सव साकारतोय” – मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
“कला आणि संस्कृती ही शहराच्या सामाजिक जीवनाला समृद्ध करणारी महत्त्वाची शक्ती आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध सांस्कृतिक प्रवाह, परंपरा आणि कलागुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होत आहे. सर्व घटकांच्या सहभागातून साकारत असलेला हा महोत्सव शहरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करेल. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,” असे मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.




Total Users : 223226