spot_img
spot_img
spot_img

११ रुपयांचा IV सेट रुग्णाला ३२५ रुपयांना! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून केंद्राला नियमनाची शिफारस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत वैद्यकीय उपकरणांवर मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत समोर आला आहे. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी केलेला IV सेट (सलाईनची नळी) रुग्णांकडून तब्बल ३२५ रुपये आकारून विकला जात असल्याचे आढळले आहे. खरेदी आणि विक्री किमतीतील या प्रचंड फरकामुळे वैद्यकीय उपकरणांच्या दरांवर नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र FDAने राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या कमाल किरकोळ किमतींची (MRP) पडताळणी केली. या पाहणीत काही उपकरणांमध्ये खरेदी किमतीच्या तुलनेत तब्बल हजारो टक्क्यांपर्यंत फरक असल्याचे समोर आले.

FDAच्या पाहणीत ११.०५ रुपयांचा IV सेट ३२५ रुपयांना रुग्णाच्या बिलात आकारला जात असल्याचे आढळले. म्हणजेच मूळ खरेदी किमतीच्या तुलनेत तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंतचा फरक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रुग्णाला उपचाराच्या वेळी आवश्यक असलेल्या उपकरणाची प्रत्यक्ष खरेदी किंमत किती आहे आणि त्यावर किती रक्कम आकारली जात आहे, याची माहिती अनेकदा उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णालय यांच्यातील माहितीच्या या तफावतीचा आर्थिक परिणाम रुग्णांवर होऊ शकतो.

या प्रकाराची गंभीर दखल घेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहिले आहे. वैद्यकीय उपकरणांवरील ट्रेड मार्जिनला मर्यादा घालण्यासाठी तातडीने नियमन करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.

मुंढे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वरही या विषयावर भूमिका मांडली. रुग्णालयाच्या बिलामध्ये उपचाराशी थेट संबंधित नसलेल्या घटकांचा खर्चही मोठा असू शकतो, असे त्यांनी नमूद केले. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला औषध किंवा वैद्यकीय उपकरणाची मूळ किंमत आणि त्यावर आकारला जाणारा नफा किती आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार आणि माहिती सहज उपलब्ध नसल्याने ‘Information Gap’ हा सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटले.

औषधांच्या किमतींप्रमाणेच वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीतील नफा आणि ट्रेड मार्जिनवरही प्रभावी नियंत्रण असावे, अशी मागणी या पार्श्वभूमीवर पुढे आली आहे. FDAच्या पाहणीतून समोर आलेल्या या आकडेवारीमुळे रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या दरांमध्ये पारदर्शकता आणण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!