spot_img
spot_img
spot_img

गणपती सजावटीच्या सामानावरून घरात राडा

मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप; वडिलांना पाइपने मारहाण, मुलगा-पत्नी विरुद्ध गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 गणपती सजावटीचे साहित्य घराबाहेर रस्त्यावर कुठे ठेवायचे, या किरकोळ कारणावरून कुटुंबात झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याची घटना सुसगाव परिसरात घडली. वादादरम्यान मोबाईल हिसकावून घेण्यासह वडिलांना पाइपने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामनाथ कासार यांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गणपती सजावटीचे साहित्य रस्त्यावर ठेवण्याच्या कारणावरून रामनाथ कासार आणि त्यांचा मुलगा प्रथमेश कासार यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढण्याचा रामनाथ यांनी प्रयत्न केला. त्यावेळी प्रथमेश याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर वाद आणखी वाढला. प्रथमेश याने रामनाथ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पाइपने त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत रामनाथ यांच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या घरगुती वादाचे रूपांतर थेट मारहाणीच्या घटनेत झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!