शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंद्रायणी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पिंपरी-चिंचवडमधील मानाचा २१ वा भव्य दहीहंडी उत्सव यंदा हजारो नागरिक आणि तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने जल्लोषात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. इंद्रायणीनगर येथील मिनी मार्केटजवळील मोकळ्या मैदानावर रंगलेल्या या उत्सवात मुंबईच्या मोरया मित्र मंडळ गोविंदा पथकाने (छत्रपती शिवाजी महाराज नगर, गोवंडी) उत्कृष्ट समन्वय व कौशल्याचे प्रदर्शन करत मानाची दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला.
या भव्य सोहळ्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई परिसरातील नामांकित २१ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गोविंदा पथकांनी एकापेक्षा एक थर रचत उपस्थितांना थरारक क्षणांचा अनुभव दिला.
गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत इंद्रायणी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आवश्यक सुरक्षा साधने, खबरदारीच्या उपाययोजना तसेच वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे उत्सव उत्साहासोबतच सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

या महोत्सवाला राजकीय, सामाजिक, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका सुलभाताई उबाळे, नगरसेविका अश्विनीताई वाबळे, माजी नगरसेवक संजय वाबळे, माजी नगरसेवक संतोष लांडगे, नगरसेविका भीमाताई फुगे, नगरसेवक विराज लांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मराठी सिनेसृष्टीतील ‘देवयानी’ फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे तसेच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. त्यांच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत इंद्रायणी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष तथा नगरसेवक तुषार सहाणे यांनी केले. दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या मोरया मित्र मंडळ गोविंदा पथकाचा आयोजक आणि मान्यवरांच्या हस्ते मानाचा चषक व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना तुषार सहाणे म्हणाले, “गेल्या २१ वर्षांची संस्कृती, परंपरा, सामाजिक एकता आणि खेळाडूंची सुरक्षा यांना प्राधान्य देत यंदाचाही दहीहंडी उत्सव सर्व मान्यवर, सहकारी आणि नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत दिमाखात पार पडला. सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे आणि उपस्थित जनसागराचे मी मनापासून आभार मानतो.”
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इंद्रायणी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 224587