शबनम न्यूज | प्रतिनिधी
कृष्णानगर व परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित नागरी समस्या आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी मारुती गणपत जाधव यांनी पुणे येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी कृष्णानगर परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, ड्रेनेज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
स्पाईन रोडवरील वाईन्समुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
यावेळी स्पाईन रोड येथील एका वाईन्स शॉपी मुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे मारुती जाधव यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. वाईन्स परिसरात होणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन सुनेत्राताई पवार यांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठेंचे पुस्तक भेट
दरम्यान, जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देऊन सुनेत्राताई पवार यांचा साहित्यिक व सामाजिक विचारांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. सामाजिक परिवर्तन, समता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केलेल्या प्रभावाची आठवण यावेळी करून देण्यात आली.
नागरिकांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे सांगितले. तसेच प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
“नागरिकांच्या समस्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्षात सुटाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने ठामपणे पाठपुरावा केला जाईल. विकासकामांसोबतच परिसरातील महिलांची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा विषय असून, त्यासाठीही सातत्याने आवाज उठवला जाईल,” असे मारुती जाधव यांनी सांगितले.










Total Users : 219384