spot_img
spot_img
spot_img

ड्रग्जच्या पैशातून उभारलेले ‘आर्थिक साम्राज्य’ पोलिसांच्या निशाण्यावर!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशातून जमीन आणि बांधकामाच्या रूपात संपत्ती उभी करणाऱ्या टोळीप्रमुखाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एमडी तस्करीच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख जुनेद अफजल खान आणि त्याची पत्नी फौजिया सुलेमान साटी/खान यांच्याशी संबंधित ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता गोठविण्याची (Freezing) कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईला सक्षम प्राधिकरण, मुंबई यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी आदेशाद्वारे कायम ठेवले आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय या मालमत्तेचे हस्तांतरण अथवा कोणताही व्यवहार करता येणार नाही.

५५.२९ ग्रॅम एमडी जप्तीनंतर आर्थिक धागेदोरे उघड

सांगवी पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५९६/२०२५ मध्ये पोलिसांनी ५५.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. गुन्ह्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू झाल्यानंतर तपास गुन्हे शाखा-२ कडे सोपविण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींच्या स्थावर मालमत्तेची माहिती मिळविण्यात आली. त्यात गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट क्रमांक २२७४ मधील तीन गुंठे (३,००० चौ. फूट) जमीन आणि त्यावरील बांधकाम आढळून आले. या मालमत्तेची अंदाजे किंमत ५५ लाख १६ हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांच्या तपासानुसार ही मालमत्ता अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने, तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम यांनी उपलब्ध पुराव्यांसह सक्षम प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे मालमत्ता फ्रीझ करण्याचा प्रस्ताव सादर केला.

कायदेशीर उत्पन्नाचा पुरावा सादर करण्यात अपयश

सक्षम प्राधिकरणाने प्रस्तावाची छाननी करून संबंधितांची सुनावणी घेतली. मात्र, सदर मालमत्ता कायदेशीर उत्पन्नातून मिळविल्याचा पुरावा आरोपींकडून सादर करण्यात आला नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे ही मालमत्ता अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून संपादित केल्याचे मान्य करून तिच्यावरील फ्रीझिंग आदेश कायम करण्यात आला आहे.

‘ड्रग्जच्या पैशातून मालमत्ता खरेदी केली तर तीही वाचणार नाही’

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईतून अंमली पदार्थ तस्करांना स्पष्ट इशारा दिला आहे. ड्रग्ज विक्रीतून मिळालेल्या पैशातून जमीन, घर, बांधकाम किंवा अन्य मालमत्ता खरेदी करून आर्थिक साम्राज्य उभारले, तरी त्या संपत्तीवरही कायद्याचा हात पोहोचणार आहे.

अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार एनडीपीएस कायद्याबरोबरच मोक्कासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अवैध व्यापारातून निर्माण झालेल्या आर्थिक लाभांवरही फ्रीझिंग, जप्ती अथवा कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते.

पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या कारवाईला अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील आर्थिक कोंडीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम यांनी तपास करून मालमत्ता गोठविण्याची कार्यवाही केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!