spot_img
spot_img
spot_img

पिंपरीगावात उद्या रंगणार भव्य दहीहंडीचा थरार!

राशी खन्ना, महिमा मकवाना, नेहा सोनवणे, रुचिता जामदार यांची विशेष उपस्थिती; तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची बक्षिसे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाला आणखी रंगत आणण्यासाठी पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांची उपस्थिती आणि राज्यभरातून सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांमुळे यंदाचा दहीहंडी उत्सव विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

आयोजक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या पुढाकाराने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री राशी खन्ना (फेम – ‘योध्दा’), महिमा मकवाना (फेम – ‘मुसाफिर कॅफे’), नेहा सोनवणे (फेम – ‘रौंदळ’) आणि रुचिता जामदार (फेम – ‘बिग बॉस मराठी सीझन ६’) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची बक्षिसे

यंदाच्या दहीहंडी स्पर्धेसाठी आयोजकांकडून तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गोविंदा पथकांमध्ये स्पर्धेची उत्सुकता निर्माण झाली आहे. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणारा थरार नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

उत्सवाच्या निमित्ताने पिंपरीगाव परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार, कलाकारांची उपस्थिती, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे दहीहंडी उत्सवाला मोठी रंगत येणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास पिंपरी परिसरासह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!