spot_img
spot_img
spot_img

भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघातील अन्वर अन्सारी यांचा महापालिकेतर्फे सन्मान

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघात निवड झालेल्या अन्वर मुक्तार अन्सारी (रा. इंदिरानगर, सेक्टर नं. २२, निगडी, पुणे) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महापौर रवि भाऊ लांडगे आणि क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

अन्वर अन्सारी यांची डिसेंबर २०२५ मध्ये भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली. त्यानंतर रांची येथे भारत आणि नेपाळदरम्यान झालेल्या क्रिकेट मालिकेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली.

यानंतर ४ मे २०२६ ते २४ मे २०२६ या कालावधीत सिंगापूर आणि श्रीलंका येथे झालेल्या द्विपक्षीय (Bilateral) मालिकेतही अन्वर अन्सारी यांनी सहभाग घेतला. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.

आता आगामी ५ सप्टेंबर २०२६ रोजी आग्रा येथे होणाऱ्या ‘रेडियंट पेरा क्रिकेट स्पर्धेसाठी’ अन्वर अन्सारी यांची निवड झाली आहे. या स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून देशासह पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.

या सन्मानामागे प्रभागातील चारही नगरसेवक सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे, अनिल (बापू) घोलप, उत्तम भाऊ केंदळे आणि अर्चना अक्षय करांडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतर्फे अन्वर अन्सारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा प्रशिक्षक शितल मारणे तसेच महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अन्वर अन्सारी यांच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिव्यांगत्वावर मात करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्वर अन्सारी यांच्या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!