प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ल’ क्षेत्रीय (लोहगड) कार्यालयात प्रभाग क्र. ८ मधील प्रलंबित नागरी समस्या व विकासकामांसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रभागातील अनधिकृत बांधकामे, पदपथांवरील अतिक्रमणे आणि विविध रखडलेल्या विकासकामांवरून नगरसेवक तुषार सहाणे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
प्रभागातील प्रमुख रस्ते व पदपथांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभागातील सर्व बेकायदेशीर बांधकामे व फुटपाथवरील अतिक्रमणांचे तातडीने संयुक्त सर्वेक्षण करावे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता ही अतिक्रमणे त्वरित हटवून रस्ते मोकळे करावेत, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.
बैठकीत देण्यात आलेले प्रमुख निर्देश:
अतिक्रमण निर्मूलन: प्रभागातील बेकायदेशीर बांधकामे व पदपथांवरील सर्व अतिक्रमणांचे तातडीने सर्वेक्षण करून निष्कासनाची धडक मोहीम राबवणे.
आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करणे आणि गोळा होणाऱ्या ‘ग्रीन वेस्ट’ची विनाविलंब विल्हेवाट लावणे.
सार्वजनिक सुरक्षा: प्रभागातील सर्व उद्यानांमध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे.
आरोग्य व स्वच्छता: नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी यंत्रे व वाहनांची नियमित व्यवस्था करणे.
ड्रेनेज समस्या निवारण: बालाजी नगर व परिसरातील तुंबलेल्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावणे.
रखडलेली कामे सुरू करणे: मुदत संपलेल्या कंत्राटांमुळे थांबलेली विकासकामे नवीन नियोजनासह विनाविलंब सुरू करणे.
“नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात प्रशासनाने ढिलाई दाखवल्यास ती कदापि खपवून घेतली जाणार नाही; कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करू,” असा स्पष्ट इशारा तुषार सहाणे यांनी दिला.
या बैठकीस प्रभाग अध्यक्षा रेखा देवकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.




Total Users : 238940