मनसेच्या पुढाकारातून यमुनानगर, साईनाथ नगर परिसरात ६ ते ७ दिवस मोहीम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १३, यमुनानगर, सेक्टर २२, साईनाथ नगर परिसरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल ८९० नागरिकांनी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या सौजन्याने मनसे जनसंपर्क कार्यालय, साईनाथ नगर येथे अल्पदरात NCMC स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी स्मार्ट कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी सलग ६ ते ७ दिवस नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. परिसरातील तब्बल ८९० नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याने मनसेच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद आणि पुन्हा मोहीम राबविण्याची करण्यात आलेली मागणी लक्षात घेता, लवकरच पुन्हा NCMC स्मार्ट कार्ड मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन मनसेच्या वतीने देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.




Total Users : 238973