spot_img
spot_img
spot_img

अप्पू घर प्रकल्पाच्या दीर्घ मुदतवाढीला शत्रुघ्न काटेंचा आक्षेप

प्रकल्पाची संपूर्ण माहिती, सुरक्षा व्यवस्था आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन स्पष्ट झाल्याशिवाय मान्यता देऊ नये

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध अप्पू घर अम्युजमेंट पार्क प्रकल्पाला दीर्घ मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रकल्पाला मुदतवाढ देण्यापूर्वी प्रस्तावित नवीन उपक्रम, खेळणी, साहसी क्रीडा सुविधा, सुरक्षा व्यवस्था, प्रकल्प नियोजन आणि आवश्यक शासकीय परवानग्यांबाबत महापालिकेने स्पष्ट माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनेक वर्षांपूर्वी नागरिकांसाठी अप्पू घर अम्युजमेंट पार्क सुरू केले. कालांतराने या पर्यटनस्थळी लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळणी, वॉटर पार्क तसेच विविध सुविधा विकसित करण्यात आल्या. या प्रकल्पाचा करार कालावधी संपत असतानाच कोरोना महामारीचा कालखंड आला. या काळात प्रकल्प काही काळ बंद राहिल्याने बंद कालावधीची दोन वर्षांची मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव पुढे आला असून, प्रकल्पाला दीर्घ मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

प्रकल्पाला नव्याने काही उपक्रम व सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने मुदतवाढ देण्याचा विचार होत असल्याचे दिसत असले, तरी महापालिकेकडून नेमक्या कोणत्या नवीन सुविधांना मान्यता दिली जाणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे काटे यांनी नमूद केले आहे.

प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण शहरातील प्रमुख राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित मान्यवरांसमोर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रस्तावित नवीन खेळणी, साहसी उपक्रम आणि इतर सुविधा कोणत्या स्वरूपाच्या असतील, त्यांचे नियोजन कोणी केले आहे, प्रकल्पासाठी सल्लागार कोण आहे, याची माहितीही जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विशेषतः नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना काटे यांनी प्रस्तावित साधनांची गुणवत्ता कोण निश्चित करणार, कोणत्या नोंदणीकृत कंपन्यांची उत्पादने अथवा उपकरणे वापरण्यात येणार आहेत, तसेच शासनाच्या आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक परवानग्यांचे नियोजन काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

अप्पू घर हा शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचा आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असल्याने त्याच्या भविष्यातील विकासाबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नये. प्रकल्पाची संपूर्ण माहिती, तांत्रिक बाबी आणि सुरक्षा व्यवस्था स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका काटे यांनी घेतली आहे.

विशेष आर्किटेक्ट, अम्युजमेंट पार्क डिझायनर तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्ती किंवा संस्थांचा अधिकृत सल्ला घेऊनच प्रकल्पाला अंतिम मान्यता द्यावी. तोपर्यंत कोणतीही मान्यता, अंमलबजावणी किंवा कामाचे आदेश देऊ नयेत, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!