पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनला पाहिजे. अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’ पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी (दि. २) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी पोलीस आयुक्त चौबे बोलत होते. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखणे, शासन-प्रशासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे, तसेच सामाजिक प्रबोधन व जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून ‘श्री मोरया पुरस्कार’ हा उपक्रम राबविला जात आहे.
या वेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, संदीप आटोळे, रोहिदास पवार, धीरज पाटील, मारुती जगताप, डॉ. विक्रांत देशमुख, गणेश इंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा धीरज पाटील यांनी ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि पुरस्काराचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
उत्कृष्ट देखावे, शिस्तबद्ध मिरवणूक आणि उल्लेखनीय आयोजन करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १४ सार्वजनिक गणेश मंडळांना ‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’ अंतर्गत पारितोषिके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांचे सुमारे एक हजार पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, अंमली पदार्थविरोधी जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होईल, असा संदेश या पुरस्कार सोहळ्यातून देण्यात आला.










Total Users : 218058