spot_img
spot_img
spot_img

गणेश विसर्जन घाटांची नाना काटे यांच्याकडून पाहणी

स्वच्छता, विद्युत व्यवस्था व घाट दुरुस्तीची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो मंदिराशेजारील घाटासह परिसरातील विविध विसर्जन घाटांची मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य, विद्युत व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनासाठी घाटांवर येत असल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी घाट परिसरातील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विसर्जन घाट परिसरातील स्वच्छता व साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील लाईट व विद्युत खांबांची तपासणी करून विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आवश्यक त्या ठिकाणी फ्लड लाईट्सची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.

याशिवाय घाटांची आवश्यक दुरुस्ती व डागडुजीची कामे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश स्थापत्य विभागाला देण्यात आले. विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यावर नाना काटे यांनी भर दिला.

गणेशोत्सव काळात घाटांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, घाटांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

या पाहणीप्रसंगी स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील दांगडे, संजय बंडगर, कनिष्ठ अभियंता जाई जाधव, समृद्धी पाटील, आश्लेषा सानप, अमित पवार, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, गणेश राजगे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता बाप्पुसाहेब रोकडे, वीज पर्यवेक्षक राहुल संभु, असिफ शेख यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व नागरिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!