spot_img
spot_img
spot_img

जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने हल्ला; बोपखेलमध्ये टोळक्याची दहशत

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब

बोपखेल येथील गणेशनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून एका तरुणावर धारदार शस्त्रे व लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. ३०) रात्री घडली. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात सहा जणांसह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अटकेत असून, तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार प्रकाश डोंगरे (वय २३, रा. बोपखेल) यांच्यावर आरोपींनी संगनमत करून हल्ला केला. धारदार शस्त्रे व लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करण्यात आले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.

हल्ल्यानंतर आरोपींनी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना शस्त्रे दाखवत दहशत निर्माण केली. ‘मध्ये कोणी आले तर सोडणार नाही’, अशी धमकी देत हवेत शस्त्रे फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही’, असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी दिपचंद यादव (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. दर्शन यादव, सिद्धार्थ पैठणे आणि श्लोक उग्राल या तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अनुज घोंगडे, पियुष रोकडे, मयंक ऊर्फ मडडू तसेच दोन अनोळखी संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

दिघी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, दहशत निर्माण केल्याप्रकरणी अतिरिक्त कलमाचीही वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भिसे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!