देहू | प्रतिनिधी युनूस खतीब
देहू नगरपंचायत हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवर सन २०११ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या निवासी मालमत्तांची नगरपंचायतीच्या मालमत्ता रजिस्टरमध्ये नोंद करून नियमानुसार मालमत्ता कर आकारणी करावी. तसेच सन २०११ नंतरच्या निवासी मालमत्तांचे सर्वेक्षण करून पात्र मालमत्तांवर कर आकारणीची कार्यवाही करावी, अशी मागणी नगराध्यक्षा पूजा अमोल दिवटे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात विशेष सभा ठराव क्र. १, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ याचा संदर्भ देण्यात आला आहे.
देहू नगरपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून गरजू नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना नगरपंचायतीमार्फत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, कचरा संकलन यांसह विविध नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, संबंधित निवासी मालमत्तांची नगरपंचायत अभिलेखात नोंद नसल्यामुळे नागरिकांना पत्ता पुरावा, वीज जोडणी तसेच विविध शासकीय कामकाजात अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष सभा ठरावानुसार सन २०११ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या निवासी मालमत्तांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मालमत्ता रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी. त्यानंतर नियमानुसार मालमत्ता कर आकारणी करून नागरिकांना अधिकृतपणे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दिवटे यांनी केली आहे.
तसेच सन २०११ नंतर अस्तित्वात आलेल्या निवासी मालमत्तांचेही दुसऱ्या टप्प्यात नियमानुसार सर्वेक्षण करावे. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या मालमत्तांची नोंद घेऊन कर आकारणीची कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिक कर भरण्यास तयार असून नगरपंचायतीच्या कार्यवाहीस सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे मालमत्ता कर भरण्याची अधिकृत सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी मदत होण्यासोबतच नगरपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी केली आहे.




Total Users : 239401