शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड : दिवाळी सणासाठी मूळ गावी गेलेल्या व्यावसायिकाच्या इनोव्हा कारमध्ये ठेवलेली तब्बल तीन लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना चिंचवड गावातील गोयल गरिमा सोसायटी परिसरात घडली आहे. गाडीमध्ये ठेवलेली रोकड मालकाच्या संमतीशिवाय घेऊन आरोपी उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सचिन संपतराव काकडे (वय ४७, रा. फ्लॅट क्रमांक १०४, एच-विंग, गोयल गरिमा सोसायटी, केशवनगर, चिंचवडगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव महेंद्र राजपूत (वय २०, रा. बलिराज धुरीखेडा, निहास्था, रायबरेली राज्य, उत्तर प्रदेश) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत गोयल गरिमा सोसायटीसमोरील फॅब्रिकेशन गोडाऊनमध्ये पार्क केलेल्या इनोव्हा कारमधून ही रोकड चोरीला गेली. फिर्यादी सचिन काकडे यांनी त्यांच्या एमएच १४ बीएल यू ०९५५ क्रमांकाच्या इनोव्हा कारमध्ये तीन लाख रुपये रोख ठेवले होते. आरोपी महेंद्र राजपूत याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय कारमधील तीन लाख रुपयांची रोकड घेतली आणि ती घेऊन आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेला.
दिवाळी सण असल्याने फिर्यादीही आपल्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर ते परत आल्यानंतर आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने फोन उचलणे बंद केले. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. चौकशीदरम्यान आरोपीने त्यांच्या कारमधील तीन लाख रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर सचिन काकडे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी महेंद्र राजपूत याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 239207