शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून उजव्या हातालाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालकाविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजू ओमप्रकाश गोगलिया (वय ५८, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील पुणे-मुंबई महामार्गावर पायोनियर हॉस्पिटलसमोर पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला.
फिर्यादी राजू गोगलिया हे टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी क्रमांक एमएच ०२ जीडब्ल्यू ६३३२ घेऊन शिरगावकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच २४ सीडी ५२३३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे फिर्यादी रस्त्यावर पडले. त्याचवेळी त्यांच्या उजव्या पायावर ज्युपिटर दुचाकी पडल्याने पायाच्या गुडघ्याखालील भागात फ्रॅक्चर झाले. तसेच उजव्या हाताच्या कोपराला खरचटून दुखापत झाली. या अपघातात त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.
भरधाव वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 239219