पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब
नवीन खरेदी केलेल्या वाहनांची रील व चित्रीकरण करण्यासाठी मुंबई-बंगळुरू महामार्गावर विनापरवाना वाहतूक अडवून इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांवर बावधन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेली दोन फॉर्च्युनर वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-बंगळुरू महामार्गावर काही इसमांनी सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करून इतर वाहनांची वाहतूक रोखली. नवीन खरेदी केलेल्या वाहनांचे चित्रीकरण व रील तयार करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनचालकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण झाला.
याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५, २८१, २२३, ३(५) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान सोमनाथ अशोक केदारी (रा. कुसगाव, मावळ) आणि अजय संभाजी यादव यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच रील चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार क्रमांक एमएच १४ केएच ५६४४ आणि एमएच १४ एलयू १०८० ही दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलिस आयुक्त कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, परवेज शिकलगार, पोलिस उपनिरीक्षक ठाकरे तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.




Total Users : 226270