शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भक्ती-शक्ती चौक – प्राधिकरण – चिंचवडेनगर – वाल्हेकरवाडी – चिंचवड मार्गे ताथवडे या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक शेखर चिंचवडे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली.
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव आणि ताथवडे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागातील नागरिकांची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्यांवरील वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे या भागांना मेट्रोसारख्या जलद, सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी जोडणे आवश्यक असल्याचे चिंचवडे यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र चिंचवडची ओळख आहे. चिंचवडला मेट्रो सेवेशी जोडल्यास शहरातील नागरिकांसोबतच बाहेरील भागातून चिंचवडमध्ये येणाऱ्या भाविक, पर्यटक आणि प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे चिंचवडला मेट्रो नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे ही भविष्यातील गरज असल्याचे शेखर चिंचवडे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या भक्ती-शक्ती–रावेत–वाकड या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा विचार केला जात आहे. त्यासोबतच भक्ती-शक्ती चौक – प्राधिकरण – चिंचवडेनगर – वाल्हेकरवाडी – चिंचवड मार्गे ताथवडे या स्वतंत्र मार्गिकेचेही नियोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मार्गिकांचा समन्वय झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील मोठा भाग मेट्रोच्या जाळ्याने जोडला जाऊ शकतो.
प्रस्तावित मार्गिकेमुळे प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव आणि ताथवडे परिसरातील चार लाखांहून अधिक नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला, व्यावसायिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मेट्रोमुळे जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
तसेच या मार्गिकेमुळे प्रमुख रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होऊन वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च कमी होण्यास हातभार लागेल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेता शहराच्या विविध भागांना जोडणारे सर्वसमावेशक मेट्रो नेटवर्क उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रस्तावित भक्ती-शक्ती ते ताथवडे मार्गिकेचा गांभीर्याने विचार करून आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशी भूमिका शेखर चिंचवडे यांनी मांडली.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित मार्गिकेच्या नियोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत ग्वाही दिल्याचे शेखर चिंचवडे यांनी सांगितले.





Total Users : 217514