शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अतिदाट वस्ती आणि अतिजोखमीच्या झोपडपट्टी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर’ येथे विविध प्रकारच्या मोफत आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वाच्या विषयाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली आहे.
शहरातील ज्या भागांमध्ये नागरिक मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतात आणि ज्या भागांतून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त आहे, अशा वस्त्यांमधील नागरिकांना उपचारासाठी दूर जावे लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे दाटीवाटीच्या वस्तीमधील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच परिसरात परवडणाऱ्या आणि गुणवत्तेच्या आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा व गर्भवती मातांची तपासणी, टेलीकन्सल्टेशन, लसीकरण, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात माता आणि बालक आरोग्य सेवा, मौथलिक आरोग्य सेवा, नेत्र, कान-नाक-घसा तपासणी, वयोवृद्धांसाठी विशेष आरोग्य सेवा आणि रुग्णांकरिता योगा वर्गाचे आयोजन यांसारख्या वीस विविध प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात पद्मावती चिखली, दापोडी मेट्रो जिजाऊ, जाधववाडी, खिवंसरा पाटील (वाकड) आणि चिखली यांसारख्या ठिकाणी ‘आपला दवाखाना’ आधीच कार्यान्वित करण्यात आले असून, आता या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी अधिक सक्षमपणे घेतली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य, कष्टकरी आणि झोपडपट्टी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. अनेकदा आर्थिक स्रोत किंवा दळणवळणाच्या समस्येमुळे नागरिक वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. ही अडचण ओळखून आपल्या दाराजवळच उच्च दर्जाच्या मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर’ येथे विविध आरोग्य सेवा सुरू करण्याच्या विषयाला स्थायी समितीच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे.





Total Users : 217333