शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील वृक्ष गणनेसाठी नव्याने काढण्यात आलेली निविदा तात्काळ रद्द करावी, तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या वृक्ष गणनेच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी युवक आघाडीचे रविराज काळे यांनी केली आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील वृक्ष गणनेसाठी GIS आणि GPS आधारित मॅपिंगच्या माध्यमातून नव्याने निविदा प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे. या निर्णयाला आप युवक आघाडीने तीव्र विरोध दर्शविला असून, महापालिकेच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी ‘टेरॅकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी एजन्सीला सॅटेलाइटच्या माध्यमातून शहरातील वृक्ष गणनेचे काम देण्यात आले होते. या कामासाठी महापालिकेने तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपये खर्च केले असल्याचा दावा रविराज काळे यांनी केला आहे.
मात्र, एवढा मोठा निधी खर्च करूनही वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाले नसेल, तर पुन्हा त्याच स्वरूपाचे काम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची नवीन निविदा काढण्याची गरज काय, असा सवाल आप युवक आघाडीने उपस्थित केला आहे.
“पूर्वीची वृक्ष गणना प्रत्यक्षात पूर्ण झाली नसेल किंवा काम सदोष असेल, तर संबंधित ठेकेदार एजन्सीला संपूर्ण बिल कशाच्या आधारावर अदा करण्यात आले? करदात्या नागरिकांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित काम झाले नसेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल रविराज काळे यांनी केला.
महापालिकेच्या तिजोरीतून मोठी रक्कम खर्च झाल्यानंतरही पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी आप युवक आघाडीने केली आहे. जुन्या वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाले नसेल, तर संबंधित एजन्सीकडून काम पूर्ण करून घ्यावे. काम सदोष अथवा अपूर्ण असल्यास अदा केलेली रक्कम वसूल करावी आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच काम पूर्ण झाले नसतानाही बिल मंजूर करण्यामागे उद्यान विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका होती, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
वृक्ष गणनेचे काम अपूर्ण किंवा सदोष असतानाही संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले असल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी रविराज काळे यांनी केली आहे.
“अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संगनमतामुळे बिल मंजूर झाले असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नुकसान झालेली रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच महापालिका आणि शहरातील करदात्या नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदार एजन्सी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही आप युवक आघाडीने केली आहे.
आपच्या प्रमुख मागण्या :
- आप युवक आघाडीने महापालिका प्रशासनासमोर चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
- पहिली, नव्याने काढण्यात आलेली वृक्ष गणनेची निविदा तात्काळ रद्द करावी.
- दुसरी, जुन्या ठेकेदाराकडून वृक्ष गणनेचे काम पूर्ण करून घ्यावे. काम पूर्ण झाले नसेल किंवा सदोष असेल तर अदा केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे.
- तिसरी, बिल मंजूर करण्यास जबाबदार असलेल्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावे.
- चौथी, आर्थिक गैरव्यवहार किंवा फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
निविदा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
दरम्यान, महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नवीन निविदा रद्द केली नाही आणि जुन्या वृक्ष गणनेच्या कामाबाबत योग्य ती चौकशी व कारवाई केली नाही, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.
वृक्ष गणना ही शहराच्या पर्यावरणीय नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असताना त्यासाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या वृक्ष गणनेच्या कामाची सद्यस्थिती, खर्च झालेली रक्कम आणि नव्या निविदेची आवश्यकता याबाबत महापालिका प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.





Total Users : 217359