spot_img
spot_img
spot_img

खड्डेमुक्त रहाटणीसाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन रस्त्यावर; खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेग

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात प्रत्यक्ष पाहणी; प्रशासनाकडून कोल्ड मिक्सने खड्डे बुजविण्यास सुरुवात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रहाटणी–तापकीर नगर प्रभागात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करत महापालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी प्रभागातील विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. नखाते चौकाकडून एस.एन.बी.पी. शाळेकडे जाणारा रस्ता, शिवराज नगर मुख्य रस्ता, दयाल हाईट्स व रॉयल मॅजेस्टिक सोसायटीसमोरील रस्ता तसेच आदिनाथ कॉलनी परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान धोकादायक ठरत असलेले खड्डे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर कोल्ड मिक्सचा वापर करून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. नगरसेवक त्रिभुवन यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी केली.

नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राहणे आणि पावसाळ्यात अपघातांना आळा घालणे याला प्राधान्य देत प्रभागातील उर्वरित खड्डेही टप्प्याटप्प्याने बुजविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी महापालिकेच्या ड प्रभाग स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंता आश्लेषा सानप, सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले आणि एकनाथ मंजाळ उपस्थित होते.

“रहाटणी–तापकीर नगर परिसरातील नागरिकांना खड्ड्यांमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रभागातील प्रत्येक रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने खड्डे बुजविण्याचे काम करून घेतले जात आहे. उर्वरित खड्डेही टप्प्याटप्प्याने बुजवून रहाटणीला खड्डेमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी सांगितले.

खड्डेमुक्त, सुरक्षित आणि सुकर रहाटणीसाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सुरू केलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!