शबनम न्यूज | प्रतिनिधी
चोवीस तास जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत पिंपरी-चिंचवड युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. वाकड पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून त्यांच्या कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमाचे आयोजन युवती सेना जिल्हाप्रमुख सायलीताई साळवी यांनी केले होते. यावेळी चिंचवड विधानसभा अध्यक्ष सुप्रियाताई बोत्रे यांच्यासह युवती सेनेच्या विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
यामध्ये अक्षदा वाळुंज (विभाग प्रमुख), वैशालीताई चांदोळकर (विभाग प्रमुख), लताताई वावगे, सुलक्षनी पवार, समिंद्रा जाधव, मीरा वाळुंज, मनीषा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी पोलिसांच्या हातावर राखी बांधत त्यांना औक्षण करण्यात आले. पोलिसांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा हा अनोखा उपक्रम राबविला.
“पोलीस चोवीस तास जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असतात. त्यांच्या कर्तव्यामुळेच आपण सुरक्षितपणे आणि बिनधास्तपणे कुठेही फिरू शकतो. मात्र सण-उत्सवाच्या काळातही पोलिसांना बंदोबस्तामुळे सुट्टी मिळत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी जाता येत नाही. म्हणूनच आम्ही पोलिसांना आपले भाऊ मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा निर्णय घेतला,” अशी भावना जिल्हाप्रमुख सायलीताई साळवी यांनी व्यक्त केली.
युवती सेनेच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. कर्तव्य बजावताना सणापासून दूर राहणाऱ्या पोलिसांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.





Total Users : 217358