शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक ११ येथील तुलसी लँडमार्क सोसायटीमध्ये ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) नगरसेवक तुषार भिवाजी सहाणे आणि नगरसेविका अश्विनी संजय वाबळे , नगरसेविका नम्रता लोंढे व नगरसेवक डॉक्टर सुहास कांबळे, माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सेक्टर ११ आणि १३ मधील नागरिकांनी परिसरातील विविध मूलभूत, नागरी आणि विकासकामांशी संबंधित प्रश्न मांडले. सामाजिक कार्यकर्ते शिवराज लांडगे योगेश लोंढे आणि परिसरातील नागरिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते
नागरिकांच्या समस्या केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या नसून त्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत अधोरेखित झाले. पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाईन, रस्ते, वाहतूक, कचरा, अतिक्रमण, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षा तसेच उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसंदर्भात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
सेक्टर ११ आणि १३ मधील नागरिकांना पूर्ण क्षमतेने आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची समस्या बैठकीत मांडण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि सोसायट्यांची संख्या लक्षात घेता उपलब्ध पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिन्यांची क्षमता वाढविणे, दाब सुधारण्यासाठी उपाययोजना करणे आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनची समस्या
पावसाळ्यात पाणी साचणे, ड्रेनेज व्यवस्थेवरील ताण आणि अंतर्गत भागातील अपुऱ्या सुविधांचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. सेक्टर १३ च्या अंतर्गत भागात ड्रेनेजची कामे करण्याची मागणी करण्यात आली.
ड्रेनेज लाईन आणि स्टॉर्म वॉटर लाईनची सद्यस्थिती तपासण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट करण्याची सूचना नागरिकांनी केली. भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि बांधकामे लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणेचे नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
रस्ते आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायांची मागणी
सेक्टर ११ आणि १३ परिसरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी हा देखील नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत वाहतूक विभागाला पत्र देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व्हिस रोडवर स्पीड ब्रेकर बसविणे, आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन निश्चित करणे आणि वाहतूक शिस्तीसाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
ब्रिजखालील अतिक्रमण हटविण्याची मागणी
परिसरातील ब्रिजखाली उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला. ब्रिजखालील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली.
चौक आणि मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न
सेक्टर ११ मधील कंटेनर पार्किंग परिसरात MIDC कडून येणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न नागरिकांनी बैठकीत मांडला. कचऱ्याची वेळेवर उचल, परिसराची स्वच्छता आणि कचरा साचू नये यासाठी नियमित यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.
कचरा साचल्यामुळे दुर्गंधी तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
सेक्टर ११ आणि १३ परिसरात, विशेषतः हनुमान मंदिर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली. निवासी भागात नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नियमित पोलिस बंदोबस्त व गस्त असावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
डिव्हायडरवरील झाडांची छाटणी
मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरमध्ये वाढलेली झाडे आणि फांद्यांची नियमित छाटणी करण्याची मागणी करण्यात आली. झाडांच्या फांद्यांमुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच रस्त्यावरील दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने योग्य पद्धतीने आणि नियमित झाडांची छाटणी करण्याची मागणी झाली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ची संकल्पना
तुलसी आणि रिचवुड परिसरातील उपलब्ध ओपन स्पेसचा विकास करून ‘नाना-नानी पार्क’ तयार करण्याची मागणी या बैठकीत विशेषत्वाने करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि एकत्रितपणे वेळ घालवण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बैठक व्यवस्था, चालण्यासाठी जागा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
MSEBच्या समस्यांवरही चर्चा
वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांवरही नागरिकांनी लक्ष वेधले. MSEBच्या माध्यमातून वीजपुरवठा, लाईन आणि इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली.
‘राजमाता जिजाऊ नगर’ आणि ‘क्रांती चौक’ नामकरणाची मागणी
सेक्टर ११ आणि १३ या परिसराला ‘राजमाता जिजाऊ नगर’ असे नाव देण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. तसेच सेक्टर ११ आणि १३ मधील प्रमुख चौकाला ‘क्रांती चौक’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
या नामकरणामुळे परिसराला स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
विकासाचा रोडमॅप करण्याची गरज
‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांनी आपल्या भागातील दैनंदिन समस्यांसोबतच भविष्यातील विकासाच्या गरजांकडेही लक्ष वेधले. पाणी, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा, वीज आणि उद्यान यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याबरोबरच उपलब्ध मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध विकास करण्याची मागणी करण्यात आली.
वाढती लोकसंख्या आणि निवासी सोसायट्यांचा विस्तार लक्षात घेऊन प्रभागातील पायाभूत सुविधांचे नियोजन, विद्यमान सुविधांचे ऑडिट आणि प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.
वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका: कंटेनर अस्ताव्यस्त उभे राहत असल्याने रस्ता अरुंद होतो आणि वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय: रस्त्याच्या कडेला जागा शिल्लक न राहिल्याने पादचाऱ्यांना रस्त्याच्या मध्यभागातून जीव मुठीत धरून चालावे लागते.
असामाजिक घटक व सुरक्षेचा प्रश्न: रात्रीच्या वेळी या उभ्या कंटेनरच्या आडोशाला अंधार असल्याने समाजकंटकांचा वावर वाढला असून परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरसेवक आणि नगरसेविकांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्याने संबंधित महापालिका विभागांकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते आणि किती वेळेत समस्या सुटतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.संदीप सूर्यवंशी,, प्रकाश माने, प्रवीण शेलार, युवराज शेळके, संदीप कुंभार, विनोद अहिरे उपस्थित होते
या बैठकीत नगरसेवक तुषार भिवाजी सहाणे यांनी नागरिकांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आपण प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच या प्रभागातील चारही नगरसेवकांनी समस्या अत्यंत जलद गतीने सोडविल्या जातील व नागरिकांच्या मागण्याही पूर्ण केले जातील असे आश्वासन दिले




Total Users : 239034