पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे : भरधाव वेगात वाहन चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पादचाऱ्याला पाठीमागून धडक दिल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. या अपघातात ६५ वर्षीय विलास कदम गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवरील हरणेश्वर हॉस्पिटलसमोर झाला.
याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सुनील राजकुमार सगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास बबन मोरे (वय २९, रा. दासखेड, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विकास मोरे हा एमएच ०५ एएम ३४१० या वाहनाने भरधाव वेगात जात होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या विलास कदम यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कदम गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 226205