पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
डुडुळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल २७ लाख ६६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार डुडुळगाव-मोशी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला फिर्यादीने तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिला आरोपीसह विविध मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीला इन्स्टाग्रामवर Share Market/Investment संदर्भातील जाहिरात दिसली. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲप चॅट सुरू झाले आणि त्यांना ‘520-HNW (High-Net-Worth) Customer Service’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमधून शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये एकूण २७.६६ लाख रुपये जमा केले. त्यानंतर वेबसाइटवरील खात्यात नफा व मुद्दलाची रक्कम दिसत होती. मात्र ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर वेबसाइटवरील ‘Withdrawal’ पर्यायच हटविण्यात आल्याचे फिर्यादीने सांगितले.
फिर्यादीने पैसे काढण्याबाबत संबंधित महिला आरोपीकडे विचारणा केली असता, ‘Brokerage Fee’ म्हणून आणखी १४ लाख ८३ हजार ९५३ रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर विविध मोबाइल क्रमांकांवरून संपर्क करणाऱ्या व्यक्तींशी फोन व संदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिघी पोलिसांकडून संबंधित बँक खाती, मोबाइल क्रमांक व ऑनलाइन व्यवहारांची चौकशी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.




Total Users : 226272