पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चाकण : आई आजारी असल्याचे सांगून वृद्ध व्यक्तीला पैसे दान करण्याचे आमिष दाखवत दोन अनोळखी व्यक्तींनी एका ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखी करून तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना भोसे (ता. खेड) येथे घडली.
याप्रकरणी महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून चाकण उत्तर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महादेव मंदिर, भोसे गावठाण, चाकण-शिक्रापूर रोड येथे घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी मंदिरात येऊन, ‘‘माझी आई आजारी आहे. ती बरी व्हावी म्हणून मला गरजू व वृद्ध व्यक्तींना पैसे दान करायचे आहेत,’’ असे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे मंगळसूत्र कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून सुमारे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र लंपास केले.
एका आरोपीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून तो सुमारे सहा फूट उंच, गोरा, काळा कोट परिधान केलेला, डोक्याला रुमाल व डोळ्यांवर चष्मा असा वर्णन आहे. दुसरा आरोपी सावळ्या रंगाचा, सुमारे पाच फूट पाच इंच उंच असून त्याने पांढरा फुलबाह्यांचा शर्ट, निळी पॅन्ट व पाठीवर काळी बॅग घेतली होती.
या प्रकरणी बीएनएस कलम ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण उत्तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.




Total Users : 226272