प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून विद्यार्थी आणि तरुणाईला दूर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिमंडळ-१ अंतर्गत शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.
२७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला परिमंडळ-१ हद्दीतील सुमारे १७० ते १८० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनी कोणती भूमिका बजावावी, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक विल्यम साळवे, अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मिलिंद संधान (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी), डॉ. सत्यवान कुंभार (मॉडर्न कॉलेज, निगडी) आणि मोहिनी अनेकर (सरस्वती विद्यालय, आकुर्डी) यांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबाबत आपली मते मांडली.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षक, पालक आणि पोलिसांनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
हा उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. विविध विभागांचे सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.




Total Users : 226272