spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केटच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला ८६ लाखांचा गंडा; जेलमध्ये जुळली ओळख, बाहेर येताच सायबर टोळी सक्रिय

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका आरोपीची येरवडा कारागृहात असताना सायबर गुन्ह्यातील आरोपीशी ओळख झाली आणि त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम इंडसइंड बँकेच्या खात्यात १४ जुलै रोजी पाच लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे खाते तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळ, पुणे) याच्या नावावर असल्याचे समोर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत तेजसची हिंजवडी पोलिस ठाण्यातील अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असताना येरवडा कारागृहात अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. लातूर) याच्याशी ओळख झाल्याचे समोर आले. जेलमध्येच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविण्याचे नियोजन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान, अविनाश बाकलीकर याला यापूर्वी सायबर पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि तो सुमारे दीड वर्ष न्यायालयीन कोठडीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. जामिनावर सुटल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केल्याचे तपासात आढळले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी आतापर्यंत किमान आठ बँक खाती उघडून किंवा मिळवून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर केला आहे. तसेच आणखी करंट अकाउंट उघडण्यासाठी SUSTAINBLOCK CONSTRUCTION PVT LTD आणि STRUNOVA PVT LTD या नावाने कार्यालय सुरू केल्याचेही तपासात समोर आले आहे.

अविनाश हा बीएएमएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असून, परदेशातील साथीदारांच्या संपर्कात राहून सायबर गुन्हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने कारागृहात शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांतील आरोपींशी संपर्क ठेवून त्यांचे मोबाईल क्रमांक ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने सेव्ह केल्याची माहितीही तपासात मिळाली आहे.

सायबर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, आर्थिक व्यवहारातील इतर संबंधित व्यक्ती आणि साथीदारांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!