spot_img
spot_img
spot_img

वाकडमध्ये कथित हुंडाबळी; ४२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहराला कथित हुंडाबळीच्या आणखी एका घटनेने हादरवून सोडले आहे. वाकड परिसरातील ४२ वर्षीय शिल्पा सचिन गवारे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. माहेरच्या संपत्तीतून हिस्सा आणण्यासाठी तसेच वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागण्यासाठी पती व सासरच्या मंडळींकडून शिल्पा यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या भावाने फिर्यादीत केला आहे.

‘माहेरून संपत्ती घेऊन ये’, असा तगादा लावत शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या सततच्या छळाला कंटाळून शिल्पा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी पती सचिन गवारे याच्यासह सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. छळाचे नेमके स्वरूप, कालावधी आणि आत्महत्येमागील कारणांचा वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, शिल्पा यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. बहिणीच्या मृत्यूला न्याय मिळावा यासाठी भावाला पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागल्याने या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

हुंड्याचे स्वरूप बदलले असले, तरी माहेरच्या संपत्तीवरून विवाहितेवर दबाव आणणे हा आर्थिक छळाचाच गंभीर प्रकार मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा जलद व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!