spot_img
spot_img
spot_img

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

या घटनेच्या तपासाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून माहिती घेतली. तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रकरणाचा तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार
या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.

घटना अत्यंत वेदनादायी असून, प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करावा, अशा सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने शबरी घरकुल योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर मोक्याच्या ठिकाणी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच हायमास्क दिवे बसविण्याची तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिले.

पिंपळवंडीतील वस्ती मध्ये जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल व ज्या कुटुंबाकडे जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल. अशी माहितीही श्रीमती पवार यांनी यावेळी दिली.

पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडामार्फत पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे. तसेच महिला व बालविकास आयुक्त श्रीमती वर्षा वंटवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या आहेत. सदर मदतीस न्यायालयीन समितीने मंजुरी दिली असून, दहा लाख रुपयांची रक्कम आजच पीडित कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

पीडित कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यात येईल. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, कल्पना काळे, सोनाबाई दाभाडे यांच्यासह अमित बेनके, विकास दरेकर, देवराम लांडे, पूजा बुट्टे, सुप्रिया लेंडे,उप जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह पिंपळवंडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!