spot_img
spot_img
spot_img

‘आईला दाखवायचे आहेत’ म्हणत ८२ वर्षीय महिलेचे ४० तोळे दागिने घेतले; बँकेत गहाण ठेवून ५ लाखांचे कर्ज

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी : ओळखीचा फायदा घेत ८२ वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने घेऊन ते बँकेत गहाण ठेवत पाच लाखांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे समोर आला आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची आहे. सप्टेंबर २०२१ पासून आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन, ‘माझी आई येणार आहे. माझे सोने बँकेत तारण ठेवले आहे, तिला दाखवण्यासाठी तुमचे दागिने काही दिवस वापरण्यास द्या,’ असे सांगितले.

आरोपीवर विश्वास ठेवून ८२ वर्षीय महिलेने मोठी व छोटी सोन्याची चैन, पेंडंट, दोन मोठे मंगळसूत्र, एक छोटे मंगळसूत्र, तीन जोड कानातील दागिने, दोन अंगठ्या आणि चार बांगड्या, असे एकूण अंदाजे ४० तोळे व सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडे दिले.

मात्र, आरोपीने हे दागिने महिलेच्या परवानगीशिवाय बँकेत गहाण ठेवून त्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. दागिने परत मागितल्यानंतर आरोपीकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच, ‘दागिन्यांबाबत कोणाला काही सांगू नका; सांगितल्यास दागिने परत मिळणार नाहीत,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक साखरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!