पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड : गुंतवणुकीवर दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध कारणांसाठी पैसे उकळून तब्बल १ कोटी ३२ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गजानन रमाकांत कवटिकवार याच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बळीराम जाधव (वय ४२, रा. नवी सांगवी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून दामदुप्पट रकमेचे धनादेश दिले. तसेच व्यवसायासाठी मदत, सीएमएस व्हॅनचे चार्जेस भरणे, जुन्या नोटा बदलून देणे आदी विविध कारणे सांगून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले.
मात्र, त्याबदल्यात दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडून वेळोवेळी घेतलेले २० लाख २५ हजार रुपये, तसेच इतर गुंतवणूकदारांचे १ कोटी १२ लाख ६८ हजार रुपये, अशी एकूण १ कोटी ३२ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना २९ डिसेंबर २०२१ पासून आजपर्यंत काळेवाडी फाटा येथील सप्तगीरी रिअॅलिटीच्या कार्यालयात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोकरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.





Total Users : 215893