पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना निगडीतील ओटास्कीम परिसरात घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय रणजित शेडगे (वय २८) हे २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दळवीनगर, ओटास्कीम येथील राहत्या घराजवळ उभे होते. त्यावेळी त्यांचा बहिणीचा दीर निखील साहेबराव साठे (वय ३२) तेथून जात असताना शेडगे यांनी त्याची विचारपूस केली. यावरून निखील याने वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
‘तुला जास्त माज आला आहे, थांब तुला दाखवतो,’ असे म्हणत निखील याने अंगणात पडलेला लोखंडी गज उचलून शेडगे यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. शेडगे यांनी हाताने गज अडविल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर निखीलचा भाऊ विष्णू साहेबराव साठे (वय ३८) यानेही तेथे येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निखीलने लोखंडी गजाने त्यांच्या पायावर व मांडीवर मारहाण केली.
दरम्यान, शेडगे खाली पडल्यानंतर विष्णूने त्यांच्या छातीवर व पोटावर लाथा मारल्या. तसेच नाकावर बुक्की मारल्याने त्यांना दुखापत होऊन तीन टाके पडले.
हल्ल्यादरम्यान नागरिक मदतीसाठी पुढे आले असता निखीलने ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत हातातील लोखंडी गज हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील साठे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत.





Total Users : 215893