spot_img
spot_img
spot_img

पुणे रेल्वे स्थानकावर ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त; महिला प्रवाशाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे रेल्वे जंक्शनवर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे प्रादेशिक पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ४१ लाख रुपये किमतीचे संशयित अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी पहाटे करण्यात आली.

DRI अधिकाऱ्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावर पाळत ठेवण्यात आली होती. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून प्रवास करून पुण्यातून पुढे जाणाऱ्या एका भारतीय महिला प्रवाशाची संशयावरून तपासणी करण्यात आली.

महिला प्रवाशाच्या सामानाची सखोल झडती घेतली असता २ हजार ५३२ ग्रॅम (एकूण वजन) पांढऱ्या-पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला. हा पदार्थ अॅम्फेटामाइन असल्याचा संशय आहे. तसेच ८७८ ग्रॅम वजनाच्या विविध रंगांच्या गोळ्या आढळल्या असून, त्या एमडीएमए (MDMA) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची अंदाजे किंमत ३ कोटी ४१ लाख रुपये असल्याचे DRIने सांगितले. अमली पदार्थ व मनोविकारजन्य पदार्थ कायदा, १९८५ (NDPS Act) अंतर्गत संबंधित पदार्थ जप्त करून महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास DRIकडून सुरू असून, अमली पदार्थांच्या तस्करीमागील साखळी आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. अमली पदार्थांची अवैध तस्करी रोखण्यासाठी DRIकडून गुप्त माहितीच्या आधारे कारवाया सुरू असून, या कारवाईमुळे ‘नशामुक्त भारत’ अभियानाला बळ मिळाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!