प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड, दि. २५ : शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ-१ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने एकूण १९ पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी संबंधित पानटपऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात या टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केली.
परिमंडळ-१ अंतर्गत करण्यात आलेली कारवाई :
– निगडी पोलिस ठाणे – ३ टपऱ्या
– चिंचवड पोलिस ठाणे – २ टपऱ्या
– संत तुकारामनगर पोलिस ठाणे – ६ टपऱ्या
– दापोडी पोलिस ठाणे – ३ टपऱ्या
– सांगवी पोलिस ठाणे – ५ टपऱ्या
अशा प्रकारे एकूण १९ टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम आणि सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चासकर, संत तुकारामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, दापोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच संबंधित पोलिस ठाण्यांतील अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.





Total Users : 215834