शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी महावितरण प्रशासनासोबत सातत्यपूर्ण समन्वय साधत विविध भागांतील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजनांना गती दिली आहे. निगडी-प्राधिकरणापुरते मर्यादित न राहता आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर तसेच संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर आमदार गोरखे यांचा विशेष भर आहे.
नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी, फिडरवरील बिघाड, जुन्या केबल, DTC यार्डमधील समस्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होऊ नये किंवा झाल्यास तो तातडीने पूर्ववत करता यावा, यासाठी महावितरण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली असून, काही आवश्यक उपाययोजनांनाही गती मिळाली आहे.
निगडी शाखेतील वीज व्यवस्था अधिक सक्षम
निगडी शाखेअंतर्गत २२ के.व्ही. प्रकाशगड फिडरचे संपूर्ण लाईन मेंटेनन्स करण्यात आले आहे. वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास तो तातडीने सुरळीत करता यावा, यासाठी २ GOD बसविण्यात आले आहेत. तसेच ३० DTC यार्डमधील झाडांची छाटणी आणि गवत साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
प्राधिकरण शाखेत विविध महत्त्वपूर्ण कामे पूर्ण
प्राधिकरण शाखेतही वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी २२ के.व्ही. टेल्को, २२ के.व्ही. D-३ आणि २२ के.व्ही. रसटन फिडरचे मेंटेनन्स करण्यात आले आहे.
याशिवाय ४ ठिकाणी GOD चे मेंटेनन्स करण्यात आले असून ३ नवीन GOD बसविण्यात आले आहेत. खराब झालेले १० फिडर पिलर बदलून नवीन पिलर बसविण्यात आले आहेत. तसेच १३ ठिकाणी बॉक्स मेंटेनन्स आणि १४ ठिकाणी DTC यार्डची साफसफाई करण्यात आली आहे.
जुन्या केबलऐवजी नवीन LT केबल
गुरुदत्त मंदिर, होंडा शोरूम आणि गोदावरी शाळा या महत्त्वाच्या ठिकाणी जुन्या केबल बदलून नवीन LT केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठ्याची स्थिरता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी वीजपुरवठ्याची सुविधा
या कामांमधील विशेष महत्त्वाची बाब म्हणजे २२ के.व्ही. D-३ फिडरचा वीजपुरवठा २२ के.व्ही. टेल्को फिडरवरून बॅक फिड करता यावा, यासाठी ७० मीटर नवीन २२ के.व्ही. केबल टाकण्यात आली आहे.
त्यामुळे भविष्यात D-३ फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी फिडरच्या माध्यमातून वीजपुरवठा तातडीने सुरू करता येणार आहे. परिणामी बिघाडाच्या काळात वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहण्याची शक्यता कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनुष्यबळ आणि साधनसामग्रीतही वाढ
वीज वितरण व्यवस्थेच्या देखभालीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना आवश्यक T&P साधनसामग्री, HT व LT केबल उपलब्ध करून देण्यात आली असून, अतिरिक्त मेंटेनन्स एजन्सीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाड उद्भवल्यास दुरुस्तीची कामे अधिक जलदगतीने पूर्ण करता येणार आहेत.
निगडी शाखेतील सहाय्यक अभियंता श्रीमती पवार यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी श्री. महादेव मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निगडी शाखेसाठी स्वतंत्र शिडी गाडी उपलब्ध करून देण्यास मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली असून, लवकरच ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांचा समन्वय मजबूत
नागरिकांच्या वीजविषयक तक्रारी आणि तांत्रिक समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप समन्वय ग्रुप तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून तक्रारींची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर जलद कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.
या समन्वयामध्ये अति. कार्यकारी अभियंता श्री. महाजन (प्राधिकरण उपविभाग), शाखा अभियंता निगडी श्री. मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकुर्डी श्री. शिर्के, शाखा अभियंता चिंचवड सौ. सोबळी शिंदे आणि कार्यकारी अभियंता भोसरी श्री. लहाने यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागातील समस्या सोडविण्यास कटिबद्ध
निगडी आणि प्राधिकरण परिसरातील कामांना मिळालेली गती ही केवळ एका भागापुरती मर्यादित नसून, आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर आणि संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी आमदार अमितजी गोरखे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण करणे, या पद्धतीने काम सुरू आहे. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, उर्वरित आवश्यक कामांनाही टप्प्याटप्प्याने गती देण्यात येत आहे.
“तात्पुरत्या दुरुस्तीपेक्षा कायमस्वरूपी सक्षम व्यवस्था उभारण्यावर भर” — आमदार अमितजी गोरखे
“नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे केवळ एखादा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर आमचा भर आहे.
निगडी-प्राधिकरणासह आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर आणि संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महावितरण प्रशासनासोबत समन्वयाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविणे ही आमची जबाबदारी असून, त्यासाठी सातत्याने काम करत राहू,” असे आमदार श्री. अमितजी गोरखे यांनी सांगितले.
आमदार अमितजी गोरखे यांच्या सक्रिय पुढाकारातून आणि महावितरण प्रशासनासोबतच्या सातत्यपूर्ण समन्वयातून करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. तसेच तांत्रिक बिघाडांच्या वेळी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा कालावधी कमी होण्याची अपेक्षा आहे.





Total Users : 215677