spot_img
spot_img
spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात स्टार्ट-अप विषयक एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील Innovation & Start-up Cell आणि Entrepreneurship Development Cell यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार्ट-अप’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री आशिष कलस आणि विशाल चव्हाण हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे, स्टार्ट-अपच्या संधी, नवकल्पना, उद्योजकीय परिसंस्था तसेच नावीन्यपूर्ण कल्पनांचे शाश्वत व्यवसायामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

कार्यशाळेत आशिष कलस आणि विशाल चव्हाण यांनी स्टार्ट-अपच्या संधी, कल्पनानिर्मिती, नवोपक्रम, व्यवसाय नियोजन आणि उद्योजकीय कौशल्ये या विषयांवर संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे व अनुभव सांगून नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेतील विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी चर्चेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप व उद्योजकतेविषयी जागरूकता वाढली, व्यवसायाच्या संधी ओळखणे, नावीन्यपूर्ण कल्पना विकसित करणे आणि स्टार्ट-अपच्या दिशेने प्राथमिक पावले उचलण्याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळाली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना, समस्या सोडविण्याच्या क्षमतेला आणि उद्योजकतेकडे करिअरच्या पर्याय म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनाला चालना मिळाली. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशीलता आणि उद्योजकीय संस्कृती रुजविण्यास मदत झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माझा ठाम विश्वास आहे की आजच्या या कार्यशाळेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तुम्हाला केवळ विचारांची दिशा देणार नाही, तर तुमच्यातील सुप्त उद्योजकाला जागे करेल. तुमच्या कल्पना लहान असो की मोठ्या, त्यांना सत्यात उतरवण्यासाठी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम यांची जोड द्या. मी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. कुशल पाखले यांनी मानले.तर सूत्रसंचालन प्रा. अमृता मुखेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ५२ विद्यार्थी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!