पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
वाकड येथील काळाखडक परिसरात पार्किंग आणि साईड देण्याच्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणावर दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून, वाकड पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य अजित पाटील (२०) हे काळाखडक येथील लाईफ श्री सोसायटीसमोर वाहन पार्क करून उभे होते. त्यावेळी एका अज्ञात दुचाकीस्वाराने साईड मागण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली आणि तो तेथून निघून गेला.
त्यानंतर एमएच १४ एलएस ८१७५ क्रमांकाची रिक्षा तेथे आली. रिक्षाचालकाने पार्किंगच्या कारणावरून पाटील यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच आधी गेलेला दुचाकीस्वार पुन्हा तेथे आला. त्याने रिक्षेतून लाकडी दांडके काढून पाटील यांच्या डाव्या हातावर तसेच डोक्यावर मारहाण केली. रिक्षाचालकानेही हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी शौर्य पाटील यांच्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.





Total Users : 215608