पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर परंदवडी पुलाजवळ फॉर्च्युनर कारने एका कारला जोरदार धडक देऊन चालक पसार झाल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालकासह प्रवाशांना दुखापत झाल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे, फॉर्च्युनरमधील तीन ते चार जणांनी कार थांबवण्याचा इशारा देत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६.५० वाजता शाहुराज दिलीप टिके हे अविनाश गराडे यांच्या १२ वर्षीय मुलगी आराध्या गराडे हिच्यासह क्रिकेट सामन्यासाठी रावेतहून लोणावळ्याकडे जात होते. परंदवडी पुलाजवळ मागून आलेल्या एमएच ०५ जीई १००८ क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधील तीन ते चार जणांनी हात दाखवून त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला.
कार थांबवत असताना संबंधितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर फॉर्च्युनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत फिर्यादीच्या कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली आणि तेथून पसार झाला.
या धडकेत कारचे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २२३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉर्च्युनर चालकासह चार अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू आहे.





Total Users : 215608