पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
गहुंजे येथे दुचाकीला रिक्षा आडवी लावून तरुणाचे अपहरण करत त्याला मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळ नेऊन मारहाण करून ९० हजार रुपये लुटल्याच्या दरोड्याचा गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने छडा लावला आहे. या प्रकरणातील सहा सराईत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२१ ऑगस्ट रोजी रात्री गहुंजे स्टेडियम परिसरात ही घटना घडली होती. लोढा सोसायटी गहुंजे येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअरसमोरून जात असताना आरोपींनी फिर्यादीच्या मोटारसायकलला रिक्षा आडवी लावली. त्यानंतर जबरदस्तीने त्याला रिक्षेत बसवून मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे मारहाण करून त्याच्याकडील ९० हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली होती.
घटना गंभीर असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, सीडीआर तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू केला. अखेर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरज चलवादी (२४), दीपक भंडगे (२४), अविनाश वानखेडे (२६), प्रथमेश ऊर्फ प्रतीक कंक (२७), विराज ऊर्फ सनी हिरवे (१९) आणि इसाक काजापुरम (२८) या सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा १.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वीही दरोडा व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहीदास पवार व सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील व त्यांच्या पथकाने केली.





Total Users : 215612