पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
देडगे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक हत्याराने दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी तसेच घरात घुसून मारहाण करणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. आदेशानुसार शिक्रापूर पोलिसांनी शोधमोहीम राबवून देडगे याला २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले आणि अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह पोलिस पथकाने कारवाईत सहभाग घेतला.





Total Users : 215600