spot_img
spot_img
spot_img

डीजेचा ‘थर’ कमी नको; ईद-ए-मिलाद मिरवणूक डीजेमुक्त करा

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

ईद-ए-मिलादच्या पारंपरिक मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजेचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, वारंवार तक्रारी, निवेदने व पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनने केला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी होणारी ईद-ए-मिलाद मिरवणूक पूर्णपणे डीजेमुक्त ठेवावी, अशी मागणी संस्थेने पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून फाउंडेशनकडून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त, सर्व DCP, ACP, क्राइम ब्रँच, स्पेशल ब्रँच, विविध झोनमधील पोलिस अधिकारी तसेच पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदने व तक्रारी देण्यात आल्याचे फाउंडेशनने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘डीजेचा थर कमी करणे हा उपाय नाही’

दरवर्षी मिरवणुकीतील डीजेचा आवाज कमी करण्याच्या किंवा डीजेचे ‘थर’ मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, ‘डीजेचा थर कमी नको, डीजेच पूर्णपणे बंद करा’, अशी फाउंडेशनची भूमिका आहे.

ईद-ए-मिलाद ही पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी होणारी धार्मिक परंपरा असून, मिरवणुकीत नात, सलाम, सीरत तसेच शांतता, प्रेम, मानवता व बंधुभावाचा संदेश असावा. मोठ्या आवाजातील डीजे, अनावश्यक साउंड सिस्टीम किंवा अश्लील व फिल्मी गाण्यांचा धार्मिक मिरवणुकीशी संबंध नाही, असे संस्थेने म्हटले आहे.

डीजे कोण आणते, याची चौकशी करण्याची मागणी

मिरवणुकीत मोठे डीजे नेमके कोण आणते, त्यांचे आयोजन कोण करते आणि त्यासाठी आर्थिक व्यवस्था कोण करते, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणीही फाउंडेशनने केली आहे. डीजेच्या वापराला मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांचाही विरोध असून, त्यामुळे डीजेच्या प्रकाराला संपूर्ण मुस्लिम समाजाशी जोडणे योग्य नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

२०२२ मधील घटनेचा दाखला

फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.

कारवाई न झाल्यास न्यायालयीन मार्गाचा इशारा

ध्वनीप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच लागू असलेल्या कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. २६ ऑगस्टच्या मिरवणुकीत डीजेचा वापर सुरू राहिला आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ‘Contempt of Court’ अर्थात न्यायालयाचा अवमानाबाबत योग्य न्यायालयीन कार्यवाही करण्याचा पर्याय स्वीकारू, असा इशारा फाउंडेशनने दिला आहे.

ईद-ए-मिलादच्या धार्मिक मिरवणुकीला विरोध नसून ती अधिक शांततापूर्ण, धार्मिक, शिस्तबद्ध आणि डीजेमुक्त असावी, हीच संस्थेची भूमिका असल्याचे अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख आणि संचालक अन्वर शेख यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!